Ha Gandh Fulancha (हा गंध फूलांचा): 2021

Saturday, July 17, 2021

| One Pot तुळस |

तुळस म्हटलं की झुपकेदार तुळस व टोकाला मंजीरी असं दृश्य डोळ्यांसमोर येत. बाल्कनी आणि ग्रील मध्ये दाटीवाटीने झाडं असल्याने बहुतांशी कुंड्यांमध्ये हवेने कींवा इतरत्र कारणाने मंजीरी पडुन तुळशीची रोपटी येत रहायची. अशी रोपटी एकत्र एका कुंडीत जमा करू लागले म्हणून, ह्या लेखाच नाव  "One Pot तुळस" ठेवलं आहे. सध्या एकुण ४ प्रकारच्या तुळशी ह्यात लावल्या आहेत. राम तुळस, कृष्ण तुळस, कापुर तुळस आणि सब्जा.
तुळस ही नेहमी मोठ्या आकाराच्या चौकोनी कुंडीत लावावी. त्यामुळे मुळांचे वेटोळे होऊन  (Root Bounding) तुळस मरत नाहीत. तुळशीला जर सुर्यप्रकाश कमी मिळत असेल तर पाण्याचे प्रमाण सुध्दा कमी ठेवावे. एका कुंडीत नेहमी तुळशीची एका पेक्षा अधिक रोपटी लावावी. 
साधारणतः तुळशीच्या मंजीरी खुडल्या तर तुळस मरत नाही. परंतु, मंजीरी तश्याच ठेवल्याने चिमण्या आणि pollinators जास्त प्रमाणात येतात. आणि ह्या मंजीरींची अजून रोप तयार होऊन cycle चालू राहते.
तुळस सारखी मरत असल्यास कोणत्याही फुलझाड असलेल्या कुंडीत (झेंडू वगळता) कींवा कढीपत्ता, लींबाच्या कुंडीत तुळस लावावी. तुळस ही नेहमी दुसऱ्या झाडाबरोबर छान वाढते.
तुळशीला प्रखर सुर्यप्रकाश गरजेचा आहे आणि त्याला कोणताही दुसरा पर्याय नाही. एखाद्या वेळेस तुळशीला कमी पाणी दिलं तर चालेल परंतु, जास्त पाणी देऊ नये. 
कापुर तुळस ही सर्वात सोप्पी, भराभर वाढणारी आणि देखणी तुळस आहे. त्यामुळे, तुळस वाढवण्यात अडचणी येत असल्यास कापुर तुळस लावावी. तुळशीला सुध्दा कीड लागते. त्यामुळे, अधुन मधुन तुळशीच्या पानांकडे लक्ष द्यावे.

एकदा तुळस नर्सरी मधुन विकत आणली ( कींवा कोणी भेट दिली असेल ) तर सहसा तुळस परत आणायची गरज लागत नाही.

Saturday, June 19, 2021

| जुई |

साधारणतः पहिल्या पावसाच्या आगमनानंतर जुईची इवलीशी फूलं फुलायला सुरुवात होते. ६-७ इवल्याशा पांढऱ्या नाजूक पाकळ्यांच सुगंधीत फूल. जुईचा वेल असल्याने जास्त जागा व्यापत नाही. एका कुंडीत जुई व्यतिरीक्तही दुसर फुलझाड लावू शकतो. परंतु, कुंडी मध्यम किंवा मोठ्या आकाराची हवी. जुईच्या बहरण्याचा काळ सुरू होण्यापूर्वी म्हणजेच २-३ महिने अगोदर hard pruning कराव. त्यामुळे फुल येण्याचं प्रमाण वाढत. जुईच्या पानांना कीड कींवा बुरशी / mealybugs चा प्रादुर्भाव पटकन होतो. त्यामुळे जुईच्या पानांकडे सतत लक्ष ठेवावे. १५ दिवसांतुन एकदा कडुनिंबाच्या तेलाचा फवारा करावा‌. जुईच्या फुलाला प्रखर सुर्यप्रकाशाची गरज असते. जर ह्याला कमी ऊन्ह मिळाल तर फूलं जास्त येत नाहीत. दररोज पाणी आणि १५-२० दिवसांनी खत द्यावे. बहराच्या काळात दर ७-१० दिवसांनी खत द्यावे. कधी कधी जुईला फूलं येत नाहीत त्याच एक कारण root bounding सुध्दा आहे.

जुईचा वेल जर व्यवस्थित वाढला असेल आणि नीट काळजी घेतली असेल तर जुईच्या बहराच्या काळात दररोज भरघोस फूलं येतात. संध्याकाळीच फूलं ऊमलायला सुरुवात होते. अतिशय नाजूक अश्या फुलांना हात लावतानाही विचार करावा लागतो. ह्या फुलाच सौंदर्य ह्याच्या नाजूक पाकळ्या मध्ये आहे बहुधा. 

मन प्रसन्न करणारा सुगंध आणि शुभ्र कांती असलेल इवलस नाजूक फूल "जुई"



Saturday, April 24, 2021

मोगरा (& failed attempts)

साधारण २ वर्षांपूर्वी मोगर्‍याच रोपट घरी आणलं होतं. त्यावेळी त्याला भरघोस कळ्या आल्या होत्या त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झाल कींवा गृहित धरल की आपसूकच फूलं येतील. (विसरले होते की सदाफुली नसुन मोगरा आहे). जेवढ्या चूका करता येतील तेवढ्या मोगर्‍याच्या बाबतीत केल्या आहेत.२ वर्ष मोगर्‍याला एकही फूलं आलं नाही. ह्या वर्षी मात्र डोळ्यात तेल घालून काळजी घेतली आणि त्यामुळेच कदाचित ह्या वर्षी मोगर्‍याच दर्शन झालं. आणि खरच वाटलं की मोगर्‍याच्या सुगंधापुढे त्याची एवढी काळजी घेणं worth आहे.

मोगर्‍याला दुर्लक्ष केलेलं बिलकूल सहन होत नाही. वर्षभर मोगर्‍याची काळजी घ्यावी लागते. नियमितपणे मोगर्‍याची पान check करत रहावी. पानं दुमडलेली दिसली की किटकनाशकाचा spray करावा. मोगर्‍याच्या बहराच्या काळात दर ७ दिवसांनी खत द्यावे, व इतर वेळी १५-२० दिवसांनी द्यावे. उत्तम सुर्यप्रकाश आणि नियमितपणे पाणी द्यावे. माती कोरडी रहायला नको. मोगरा ज्या कुंडीत लावला आहे त्या कुंडीत आणखी एखाद रोपट लावल तर मोगरा अधिक बहरतो. वरील २-३ इंच माती दर २०-२५ दिवसांनी उकरत रहावी.

एवढी ‍सगळी काळजी घेऊन फुललेला मोगरा बघुन आनंद द्विगुणित होतो. आणि ‍मोगर्याच्या सुगंधाला तर तोडच नाही.

Saturday, March 20, 2021

कुसुम - Treasuring Flowers

काही वर्षांपूर्वी घरी आलेल गुलाबाच फूल एका पुस्तकात सहज ठेवून दिल होत. नंतर ते पुस्तक चाळताना अचानकपणे सापडलं. जरी त्या फुलाचा सुगंध नाहिसा झाला होता परंतु फुलाच्या सौंदर्यात काही कमतरता जाणवली नाही. (टवटवीत फुलासारख सौंदर्य नसलं तरीही सुरेख दिसत होतं). त्यानंतर इतर फुला-पानांबरोबर हाच प्रयोग केला. जुन्या व जाड्या पुस्तकांमध्ये ३-४ आठवड्यांकरता फूलं ठेवून दिल्यावर ही फूल-पान कित्येक काळाच्या ठेवीसाठी तयार होतात.
ह्या सुकलेल्या फुलांचा कसा वापर करायचा ते आपल्यावर आहे किंवा ती तशीच पुस्तकांमध्ये किंवा वह्यांमध्ये ठेवून द्यावी. कधीतरी जुन पुस्तक चाळताना ते मिळालेल फूल जुनी ठेव मिळाल्यासारखा आनंद देऊन जातं.

जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती हे फुला-पानांनही लागु होत. काहींचा रंग सुकल्यावरही टिकून राहतो, काहींचा फिकट होतो तर काहींचा रंग अगदी बदलून जातो.

Though they do not smell afterwards they look beautiful in their own way.


Saturday, February 6, 2021

| अबोली |

आखीव-रेखीव, नाजूक-साजूक अशी ही अबोली container gardening साठी अतिशय उत्तम फुलझाड आहे. अबोलीची खासियत तिच्या रंगात आहे. मनमोहक भगवा रंग उन्हात अजून सुरेख दिसतो(इतर रंगातही अबोली उपलब्ध आहे). अबोलीची फुलं बराच काळ टवटवीत राहतात. अबोली गुच्छ्यांसकट फूलते. अबोलीला सुगंध नसला तरी त्याची उणीव भासत नाही. तीन अतिशय नाजूक (तरल) पाकळ्यांची फूलं गुच्छ्यांमध्ये खूप सुरेख दिसतात.

अबोली बियांपासून लावणही अगदी सोप्प आहे. २०-२५ दिवसांत रोप बऱ्यापैकी मोठं होतं आणि दीड महिन्यात फुलही यायला लागतात. अबोली आडोशाच्या जागेवर ही जगते. परंतु, भरपूर फुलं हवी असल्यास प्रखर सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे. छोटी ते मध्यम आकाराची कुंडी ह्या फुलझाडासाठी पुरेशी आहे. अबोलीची फुलं वर्षभर येत राहतात. १५-२० दिवसांतून एकदा खत व दररोज पाणी एवढ पुरेस आहे अबोलीची भरघोस फुलं येण्यास.

अबोली surely adds hint of bright colour to our home and balcony

Saturday, January 9, 2021

| कुंदा |

कुंदाचा सुगंध मोगऱ्याची आठवण करून देतो. ह्या फुलांचा सुगंध मंदपणे दरवळतो, घमघमाट नसला तरी मंद सुगंध येत राहतो. कुंदाच्या फुलांचे गुच्छ फुलले असल्यास सुगंध जास्त प्रकर्षाने जाणवतो.
परंतु, कुंदाची खासीयत त्याच्या सुगंधात किंवा उमलेल्या फुलात नसून त्याच्या कळ्यांमध्ये आहे. कुंदाच्या कळ्यांना गुलाबी रंगाच्या छटा असतात हे फूल समोरून जरी शुभ्र कांती असल तरी फुलाचा मागील भाग गुलाबी छटांचा असतो.

कुंदा मुख्यत्वे हिवाळ्यात फुलते. ह्या फुलांचा बहर अप्रतिम दिसतो.ह्याची जास्त काटछाट करू नये. कुंदाच्या झाडाला मनसोक्त वाढू द्याव (मुख्यत्वे त्याच्या बहराच्या काळात). कुंदा हे फुलझाड फारस त्रास देत नाही. मात्र, ह्याच्या पानांकडे लक्ष द्यावे, पानांना लवकर कीड /बुरशी लागते. हे फुलझाड नर्सरीमधुन घरी आणल्यावर कदाचित पटकन वाढणार नाही किंवा फुलही लवकर येणार नाहीत. परंतु, थोडी वाट बघितल्यावर व आपल्या घरात कुंदा सेटल झाल्यानंतर कुंदाच्या बहराचे दर्शन घडते. (It will surely bloom and will bloom in abundance).
कुंदाला फुलण्यासाठी उत्तम सूर्यप्रकाश, १५-२० दिवसांतुन एकदा खत, दररोज पाण्याची आवश्यकता आहे. कुंडी साधारण मध्यम किंवा मोठ्या आकाराची घ्यावी.

फूल किंवा सुगंधाच्या बाबतीत कुंदा अव्वल नसली तरीही तिची खासियत आणि सौंदर्य तिच्या कळीत दडलं आहे.