Ha Gandh Fulancha (हा गंध फूलांचा): April 2020

Saturday, April 25, 2020

पालक - Grow your own food

घरच्या घरी आपण लावलेल्या भाज्या बनवून खाण्यात खरंच एक प्रकारचं समाधान असतं.
माझ्यासारखे बरेच जण असतील जे फ्लॅटमध्ये राहतात त्यामुळे किचन गार्डनिंग मध्ये बऱ्याच मर्यादा येतात. आणि त्यातही नोकरी, इतर कामे करून बागकाम करणे म्हणजे अजून कठीण गोष्ट. पण काही भाज्या अशा आहे ज्या आपण कुंडीत लावू शकतो म्हणजेच ज्या बाल्कनी आणि विंडो ग्रिलच्या कमी जागेसाठी उत्तम आहेत. त्यातील एक पालेभाजी म्हणजे 'पालक'.
पालक ही एक अशी पालेभाजी आहे जी आपण वर्षभर कधीही लावू शकतो. पालक बियाणांपासून लावावा लागतो (पालकाच बियाणं खूप कमी दरात नर्सरी/ ऑनलाइन नर्सरीमध्ये मिळतं). साधारण चार-पाच दिवसात अंकुर येतात. एकदा true leaves दिसले की आपण त्यानंतर पालक कधीही harvest (कापणी) करू शकतो. पालक पूर्ण तयार व्हायला साधारणतः 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागतो. पहिल्यांदी पालक harvest केल्यावर (वरच्यावर पानं कापावी. मुळांपासून काढू नये ) त्यानंतर अजून १-२ वेळा परत पालक harvest करू शकतो. आठवड्यातून एकदा कडुनिंबाच्या तेलाचा फवारा मारावा. 
पालकासाठी माती तयार करताना मुबलक प्रमाणात खत घालावे (उदा. शेणखत, कंपोस्ट ) आणि दर १५ दिवसांनी खत देत रहावे. उन्हाळ्यात दररोज पाणी द्यावे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात १-२ दिवसातुन एकदा पाणी द्यावे.
तर, वर्षभर कधीही, जास्त काळजी न घेता आपण घरच्या घरी सेंद्रिय खतापासून पालक लावून हवं तेव्हा त्याचा आस्वाद घेऊ शकतो. स्वतःच्या हाताने लावलेला पालकाची चव खरंच वेगळी लागते.

{True leaves - 'बी'ला अंकुर फुटल्यावर आपल्याला छोटंस पान (एक किंवा दोन) दिसतं त्याला Cotyledons म्हणतात. हा बीचा एक भाग असतो. त्यानंतर, True leaves दिसतात. म्हणजेच, एखाद्या रोपट्याला जी भविष्यात पानं येणार आहेत त्याचं हुबेहूब पण लहान आकारातील version जे दिसायला Cotyledons पेक्षा खूप वेगळे असतं }

Saturday, April 18, 2020

लता-वेली (Vines)

वनस्पतींमधला सुंदर आणि आकर्षक प्रकार म्हणजे वेली.
वेली म्हणजे ज्या वनस्पती कोणत्याही गोष्टीचा आधार घेऊन वाढतात म्हणजेच त्यांचे खोड किंवा फांद्या मजबूत नसल्यामुळे त्या स्वबळावर वाढू शकत नाही आणि त्यांच्या याच वैशिष्ट्यामुळे आपण त्यांना ज्या जागी लावू त्या जागेला सुंदर बनवण्याचे काम नक्कीच त्या करतात.
आपण वेली हव्या त्या दिशेला वाढवु शकतो म्हणजेच उभ्या दिशेने (vertical travel) आणि आडव्या दिशेने (horizontal travel).
बऱ्याच प्रवेशद्वारांवर वेलींच्या सुंदर कमानी बघायला मिळतात. ते दृश्य नक्कीच विलोभनीय असतं  (निदान मला तरी तसं भासतं). कमीत कमी जागेत जास्तीत जास्त हिरवळ निर्माण करण्याच काम नक्कीच वेली करतात.
इमारतींमध्ये बाल्कनी railing आणि window (safety) grill इथे designing/decoration करण्यासाठी फार काही वाव नसतो. तिथे आपण ह्या वेली लावुन/सोडुन ती जागा नक्कीच सुंदर बनवु  शकतो.
वेलींमध्ये सगळ्या विभागातील वनस्पतींचा समावेश होतो. म्हणजेच औषधी, फळझाडं, foliage, फुलझाडं.
तर, ह्या नाजूका (लता-वेली) नक्कीच जागेच सौंदर्य वृद्धिंगत करण्याचं काम करतात. आणि त्यांच सौंदर्य पाहून आणखी झाडं लावायची इच्छा होते

Saturday, April 11, 2020

तुळस (Holy Basil)

हिंदू संस्कृतीमध्ये, वास्तुशास्त्रात आणि आयुर्वेदात तुळशीला फार महत्त्व आहे. तुळस संपत्ती, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेच प्रतीक आहे. एखाद्या नवीन घरी आपण गेलो आणि आपल्याला तुळशीचं छोटंसं का होईना रोपटं दिसलं की सकारात्मक ऊर्जेचा (क्षणिक का होईना) अनुभव येतो.
जुन्या धाटणीच्या घरात, गावी अंगणात तुळशी वृंदावन असतं. हल्ली इमारतींमध्ये अंगणच नसतं. परंतु, तरीही आपण बाल्कनीमध्ये, खिडकीत तुळशीचं रोपटं नक्कीच लावू शकतो. 
तुळस indoor plant म्हणूनही लावू शकतो म्हणजेच बेडरूम किंवा living room मध्ये तुळशीचं रोपटं लावू शकतो.
Basil ही वनस्पती बऱ्याच देशांमध्ये आढळली जाते. भारतात प्रामुख्याने Holy basil म्हणजेच तुळस हा प्रकार आढळतो. 
भारतात तुळशीचे प्रामुख्याने आढळणारे प्रकार :
१. कृष्ण तुळस २. राम तुळस ३. रान तुळस ४. कापूर तुळस. ह्याव्यतिरिक्तही अनेक तुळशीचे प्रकार आहेत.

तुळस घरात, घराबाहेर लावण्याचे प्रामुख्याने फायदे म्हणजे
१. हवा शुद्ध करण्याचं काम करते आणि mosquito repellent म्हणजेच तुळस असल्यास डासांचा  प्रादुर्भाव कमी होतो.
२. तुळशीची पानं गरम पाण्यात चार-पाच तास ठेवावी व नंतर त्या पाण्याचा फवारा खोलीत, बाल्कनीमध्ये मारावा.( हा नुस्का फेसबुकवर एका ग्रुप मध्ये आला होता). 
३. रोज सकाळी उठल्या-उठल्या दोन तुळशीची पानं खाणं आरोग्यदायी आहे (मात्र पानं जास्त चाऊ नये ). 
४. पाळीव प्राण्यांना उलट्या होत असतील तरीही तुळशीचा रस दिला जातो. 
५. तुळस ही उष्ण प्रकृती असलेली वनस्पती असली तरी तिच्या बिया शीतल प्रकृतीच्या असल्याने शरीरात उष्णता अधिक झाल्यास त्यांचे सेवन केले जातं

अशी ही बहुगुणी तुळस लावायला आणि वाढवायला अगदी सोप्पी आहे फक्त नियमितपणे पाणी द्यावे लागते आणि भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. तुळशीला खताची आवश्यकता नसते. परंतु, पानं चांगली टवटवीत दिसण्यासाठी महिन्यातून एकदा खत द्यावे (ज्यात नायट्रोजनचे प्रमाण अधिक असेल)
कधीकधी काही केल्या तुळस वाढतच नाही. याची कारणं बरीच असू शकतात.
१. तुळस सारखी मरत असेल तर माती बदलून बघावी किंवा दर 20 ते 25 दिवसांनी मातीचा वरचा layer खणावा (मुळांना त्रास होऊ न देता) ह्यामुळे मुळांना ऑक्सीजन मिळतो. म्हणजेच  मातीत aeration चांगलं राहतं
२. सूर्यप्रकाशाअभावी, ३. अनियमितपणे पाणी दिल्याने तुळस मरते.
४. उन्हाळ्यात मातीत कमी वेळ ओलावा टिकून राहतो. त्यामुळे मातीत cocopeat घालावे.

अश्या ह्या बहुगुणी तुळशीचं किमान एक तरी रोपटं घरी असणं गरजेच आहे








Saturday, April 4, 2020

फुलझाडं (Nature's Beauty)

बागकामाची किंवा झाडांची कुणाला आवड असो वा नसो परंतु फुलझाडं किंवा फुलांची आवड नसणाऱ्या व्यक्ती तुरळकच.
फुलांचे विविध प्रकार आहेत.काही फुले फक्त शोभेची असतात तर काहींचा गंध अगदी सुरेख असतो, काहींचा उपयोग खाण्यासाठी केला जातो तर काहींचा उपयोग औषध म्हणून केला जातो.
फुलं कोणत्याही प्रकारची असो ते आपलं मन प्रसन्न करण्याच काम नक्कीच करतात.

सकाळी उठल्या उठल्या जर आपल्याला उमललेले फूल दिसलं तर दिवसाची सुरुवात नक्कीच चांगली होते. Quarantine च्या काळात जेव्हा घरी राहुन कंटाळा आलेला आहे तेव्हा ही गोष्ट नक्कीच जाणवते, ह्यांना फुलताना किंवा उमलताना बघून मनाची मरगळ‌ काही अंशी तरी नक्कीच कमी होते.
जर एखाद्या फुलझाडाची सुरुवात आपण बी पासून केली असेल आणि फुलं उमलण्याची वाट आपण महिनोन महिने बघितली असेल तेव्हा ते फूल उमलताना बघण्यात जे सुख आहे ते कशातच नाही.
त्यामुळेच कुणाला बागकामाची आवड नसली तरी घरी एक तरी फुलझाड किंवा तुळस असायलाच हवी. झाडांची काळजी ही प्रत्येक फूलागणीक बदलते. परंतु, चांगला बहर येण्यासाठी calcium water १५-२० दिवसातून एकदा द्यावे आणि त्यांच्या मातीमध्ये egg shells एकत्र करावे. फुलझाडांची काटछाट (pruning) सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.
गोकर्ण सर्वात सोप्प फुल आहे म्हणजे त्याची तितकीशी काळजी घ्यावी लागत नाही आणि ह्याच उलट जास्वंद, मोगरा, गुलाब यांची बर्‍यापैकी काळजी घ्यावी लागते.

ही बहुरंगी, बहुढंगी फुल प्रत्येकालाच एक सुखद आनंद देऊन जातात