Ha Gandh Fulancha (हा गंध फूलांचा)

Saturday, May 7, 2022

🌼|जीवामृत|🌼

झाडांची जास्त चांगली वाढ होण्यासाठी आपण खत वापरतो. मी अगदी सर्व प्रकारची खतं वापरून बघितली आहेत. (Liquid fertilizers to solid fertilizers, bioenzymes, etc) परंतु, जो result झाडांना जीवामृत देऊन मिळाला आहे त्याची तुलना बाकी कशाची होऊ शकत नाही. जीवामृत मुख्यत्वे गोमातेच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून बनवल जातं. बऱ्याच लेखांमध्ये आणि व्हिडीओज मध्ये मी याबद्दल वाचलं आणि ऐकलं होतं. त्यामुळे, एकदा प्रयत्न करून बघाव असं ठरवलं. पण देशी गायीच ताजं शेण मिळणं हे खूप महत्प्रयासाने शक्य झालं.( गोमूत्र शीळ वापरु शकतो मात्र शेण ताजच हव). जीवामृत बनवण्याची पद्धत आणि त्याचे मोजमाप हे तंतोतंत पाळले गेले पाहिजे (तो एक प्रकारचा संस्कारच म्हणावा लागेल) महिन्यातून दोनदा जीवामृत देणे कुंड्यांमधील झाडांसाठी पूरक आहे.

जीवामृत is game changer for me. जीवामृताशिवाय झाडं वाढवण्याचा विचारही करू शकत नाही. जीवामृताचा उपयोग फक्त खत म्हणून नाहीतर कीटकनाशक म्हणूनही होतो. गोमूत्र पाण्यात मिसळून त्याचा फवारा झाडांवर मारला तर झाडांना लागणाऱ्या रोगांच प्रमाण कमी होतं. जीवामृत नियमितपणे वापरल्यास फुले येण्यामध्ये वाढ होते, झाडांची वाढ झपाट्याने होते आणि झाडांची रोगांपासून लढण्याची ताकदही वाढते. 
आपल्याकडे किती झाड आहेत याचा अंदाज घेऊन जीवामृत बनवाव लागत. जीवामृतात मुख्यत्वे ताजे शेण, गोमूत्र, माती,  गुळ, चण्याच्या डाळीचे पीठ हे पदार्थ जातात. त्यांच्या प्रमाणाबद्दलची माहिती सहज कोणत्याही जाणकारांच्या लेखात आणि व्हिडिओमध्ये मिळेल.
जर जीवामृत बनवण्याचा वेळ नसेल तर घनजीवामृत ही बनवू शकतो. ज्याचा वापरण्याचा कालावधी सहा महिने आहे. जीवामृत शक्यतो दहा दिवसांमध्ये वापरून संपवावे लागते.

ज्यांच्याकडे झाडं आहेत कींवा झाड लावायची वाढवायची आवड आहे त्यांनी किमान एकदा तरी जीवामृत वापरून बघावे.

नमन त्या गोमातेला जिच्यामुळे मी झाडांना जीवामृत देऊ शकते !!!


Saturday, March 5, 2022

🌼 Gratitude 🌼

 तुम्ही फिरायला / भटकायला जाता आणि तुम्हाला एखाद छानस फुलझाडं दिसतं आणि ते फूल आपल्या घरी सुद्धा बहराव हा मोह आवरत नाही, तुम्ही त्या घरमालकाला त्याची फांदी अथवा बिया द्यायची विनंती करता आणि ते सुद्धा तुम्हाला हसतमुखाने ते देतात. तिथल्या मातीचा काही भाग तुम्ही आपल्या मातीत रुजवतात.
किंवा, निसर्गाच्या सानिध्यात फिरताना त्यातला काही हिस्सा तुम्हाला कुंडीत रुजावासा वाटतो. मग, तुम्ही तो फांदी/बिया किंवा मुळांसकट रोपट यांच्या रूपात घरी आणता ( अर्थात, निसर्गाकडे विनंती करायची गरज लागत नाही. त्याचे हात सदा देण्यासाठी पुढेच असतात) परंतु, वरील दोन्ही घटनांमधून मिळणारा आनंद अतुलनीय आणि अविस्मरणीय आहे.

नर्सरी मधुन आपण पैसे देऊन हवं ते फुलझाड/रोपट विकत घेतो पण त्या झाडापेक्षा कुणीतरी दिलेल्या कींवा एखाद्या ठिकाणावरून आणलेल्या रोपट्याची वाढ ही खरच छान होते.

Thanks to all those generous people and mother nature !!! 🌼

Saturday, January 29, 2022

माझी प्रिय......"🌼💕

बोगनवेल / कागदी फुलं ही माझी अतीव प्रिय फुलं आहेत. रस्त्यावरून जाताना, कुठेही फिरताना त्यांचा बहर बघितला की हे सुद्धा फुलझाड आपल्याकडे असावं असं वाटायचं (असं तर सगळ्याच झाडांबद्दल वाटतं). बोगनवेलीला इतर झाडांच्या तुलनेने मोठी कुंडी लागते आणि बाल्कनीमध्ये एवढ्या मोठ्या कुंडीसाठी जागा करणे जरा कठीण काम आहे. परंतु, बोगनवेल लावायचा मोह आवरला नाही आणि एक प्रयत्न करून बघण्यासाठी झुपकेदार बोगनवेल लावली. बोगनवेलीसाठी ३५ cm व्यास असलेली कुंडी वापरली ( जेवढी मोठी कुंडी वापरता येईल तेवढी वापरावी ) आणि त्यातच गुलाबाचे रोपटे लावले ( सहसा एका कुंडीत मी दोन झाडं लावते). बोगनवेलीला पाणी कमी लागत. परंतु, त्याच कुंडीत गुलाबही लावला असल्याने एक दिवसआड पाणी देते. प्रथमतः बोगनवेल N-E दिशेला ठेवली होती तोपर्यंत फूलं फूलली नाहित फक्त झाडाची वाढ झाली. नंतर S-W दिशेला कुंडी ठेवल्यावर तीन-चार महिन्यात बोगनवेल बहरली.

बोगनवेलीला सुगंध नसतो पण काटे असतात. परंतु, त्याचा बहर बाल्कनीमधून बघणं म्हणजे सुख💕. बोगनवेल खरं तर खूप सोप्प फुलझाड आहे. परंतु, फुलं यायला, ते झाड कुंडीत रुजायला फार वेळ लागतो. 
बोगनवेलीला पाणी कमी लागतं. त्यामुळे दोन-तीन दिवसातुन एकदा पाणी द्यावे. खत दिले नाही तरी चालण्यासारखं आहे. परंतु, पंधरा दिवसातून एकदा जीवामृत द्यावे. बोगनवेलीचा बहर सरल्यावर त्या फांद्यांची छाटणी करावी. कुंडी medium to large आकाराची वापरावी.

एक वर्ष वाट बघितल्यावर मला तिने दर्शन दिले. परंतु, वाट बघितल्याचं सार्थक झालं.

& She bloomed !💕




Saturday, July 17, 2021

| One Pot तुळस |

तुळस म्हटलं की झुपकेदार तुळस व टोकाला मंजीरी असं दृश्य डोळ्यांसमोर येत. बाल्कनी आणि ग्रील मध्ये दाटीवाटीने झाडं असल्याने बहुतांशी कुंड्यांमध्ये हवेने कींवा इतरत्र कारणाने मंजीरी पडुन तुळशीची रोपटी येत रहायची. अशी रोपटी एकत्र एका कुंडीत जमा करू लागले म्हणून, ह्या लेखाच नाव  "One Pot तुळस" ठेवलं आहे. सध्या एकुण ४ प्रकारच्या तुळशी ह्यात लावल्या आहेत. राम तुळस, कृष्ण तुळस, कापुर तुळस आणि सब्जा.
तुळस ही नेहमी मोठ्या आकाराच्या चौकोनी कुंडीत लावावी. त्यामुळे मुळांचे वेटोळे होऊन  (Root Bounding) तुळस मरत नाहीत. तुळशीला जर सुर्यप्रकाश कमी मिळत असेल तर पाण्याचे प्रमाण सुध्दा कमी ठेवावे. एका कुंडीत नेहमी तुळशीची एका पेक्षा अधिक रोपटी लावावी. 
साधारणतः तुळशीच्या मंजीरी खुडल्या तर तुळस मरत नाही. परंतु, मंजीरी तश्याच ठेवल्याने चिमण्या आणि pollinators जास्त प्रमाणात येतात. आणि ह्या मंजीरींची अजून रोप तयार होऊन cycle चालू राहते.
तुळस सारखी मरत असल्यास कोणत्याही फुलझाड असलेल्या कुंडीत (झेंडू वगळता) कींवा कढीपत्ता, लींबाच्या कुंडीत तुळस लावावी. तुळस ही नेहमी दुसऱ्या झाडाबरोबर छान वाढते.
तुळशीला प्रखर सुर्यप्रकाश गरजेचा आहे आणि त्याला कोणताही दुसरा पर्याय नाही. एखाद्या वेळेस तुळशीला कमी पाणी दिलं तर चालेल परंतु, जास्त पाणी देऊ नये. 
कापुर तुळस ही सर्वात सोप्पी, भराभर वाढणारी आणि देखणी तुळस आहे. त्यामुळे, तुळस वाढवण्यात अडचणी येत असल्यास कापुर तुळस लावावी. तुळशीला सुध्दा कीड लागते. त्यामुळे, अधुन मधुन तुळशीच्या पानांकडे लक्ष द्यावे.

एकदा तुळस नर्सरी मधुन विकत आणली ( कींवा कोणी भेट दिली असेल ) तर सहसा तुळस परत आणायची गरज लागत नाही.

Saturday, June 19, 2021

| जुई |

साधारणतः पहिल्या पावसाच्या आगमनानंतर जुईची इवलीशी फूलं फुलायला सुरुवात होते. ६-७ इवल्याशा पांढऱ्या नाजूक पाकळ्यांच सुगंधीत फूल. जुईचा वेल असल्याने जास्त जागा व्यापत नाही. एका कुंडीत जुई व्यतिरीक्तही दुसर फुलझाड लावू शकतो. परंतु, कुंडी मध्यम किंवा मोठ्या आकाराची हवी. जुईच्या बहरण्याचा काळ सुरू होण्यापूर्वी म्हणजेच २-३ महिने अगोदर hard pruning कराव. त्यामुळे फुल येण्याचं प्रमाण वाढत. जुईच्या पानांना कीड कींवा बुरशी / mealybugs चा प्रादुर्भाव पटकन होतो. त्यामुळे जुईच्या पानांकडे सतत लक्ष ठेवावे. १५ दिवसांतुन एकदा कडुनिंबाच्या तेलाचा फवारा करावा‌. जुईच्या फुलाला प्रखर सुर्यप्रकाशाची गरज असते. जर ह्याला कमी ऊन्ह मिळाल तर फूलं जास्त येत नाहीत. दररोज पाणी आणि १५-२० दिवसांनी खत द्यावे. बहराच्या काळात दर ७-१० दिवसांनी खत द्यावे. कधी कधी जुईला फूलं येत नाहीत त्याच एक कारण root bounding सुध्दा आहे.

जुईचा वेल जर व्यवस्थित वाढला असेल आणि नीट काळजी घेतली असेल तर जुईच्या बहराच्या काळात दररोज भरघोस फूलं येतात. संध्याकाळीच फूलं ऊमलायला सुरुवात होते. अतिशय नाजूक अश्या फुलांना हात लावतानाही विचार करावा लागतो. ह्या फुलाच सौंदर्य ह्याच्या नाजूक पाकळ्या मध्ये आहे बहुधा. 

मन प्रसन्न करणारा सुगंध आणि शुभ्र कांती असलेल इवलस नाजूक फूल "जुई"



Saturday, April 24, 2021

मोगरा (& failed attempts)

साधारण २ वर्षांपूर्वी मोगर्‍याच रोपट घरी आणलं होतं. त्यावेळी त्याला भरघोस कळ्या आल्या होत्या त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झाल कींवा गृहित धरल की आपसूकच फूलं येतील. (विसरले होते की सदाफुली नसुन मोगरा आहे). जेवढ्या चूका करता येतील तेवढ्या मोगर्‍याच्या बाबतीत केल्या आहेत.२ वर्ष मोगर्‍याला एकही फूलं आलं नाही. ह्या वर्षी मात्र डोळ्यात तेल घालून काळजी घेतली आणि त्यामुळेच कदाचित ह्या वर्षी मोगर्‍याच दर्शन झालं. आणि खरच वाटलं की मोगर्‍याच्या सुगंधापुढे त्याची एवढी काळजी घेणं worth आहे.

मोगर्‍याला दुर्लक्ष केलेलं बिलकूल सहन होत नाही. वर्षभर मोगर्‍याची काळजी घ्यावी लागते. नियमितपणे मोगर्‍याची पान check करत रहावी. पानं दुमडलेली दिसली की किटकनाशकाचा spray करावा. मोगर्‍याच्या बहराच्या काळात दर ७ दिवसांनी खत द्यावे, व इतर वेळी १५-२० दिवसांनी द्यावे. उत्तम सुर्यप्रकाश आणि नियमितपणे पाणी द्यावे. माती कोरडी रहायला नको. मोगरा ज्या कुंडीत लावला आहे त्या कुंडीत आणखी एखाद रोपट लावल तर मोगरा अधिक बहरतो. वरील २-३ इंच माती दर २०-२५ दिवसांनी उकरत रहावी.

एवढी ‍सगळी काळजी घेऊन फुललेला मोगरा बघुन आनंद द्विगुणित होतो. आणि ‍मोगर्याच्या सुगंधाला तर तोडच नाही.

Saturday, March 20, 2021

कुसुम - Treasuring Flowers

काही वर्षांपूर्वी घरी आलेल गुलाबाच फूल एका पुस्तकात सहज ठेवून दिल होत. नंतर ते पुस्तक चाळताना अचानकपणे सापडलं. जरी त्या फुलाचा सुगंध नाहिसा झाला होता परंतु फुलाच्या सौंदर्यात काही कमतरता जाणवली नाही. (टवटवीत फुलासारख सौंदर्य नसलं तरीही सुरेख दिसत होतं). त्यानंतर इतर फुला-पानांबरोबर हाच प्रयोग केला. जुन्या व जाड्या पुस्तकांमध्ये ३-४ आठवड्यांकरता फूलं ठेवून दिल्यावर ही फूल-पान कित्येक काळाच्या ठेवीसाठी तयार होतात.
ह्या सुकलेल्या फुलांचा कसा वापर करायचा ते आपल्यावर आहे किंवा ती तशीच पुस्तकांमध्ये किंवा वह्यांमध्ये ठेवून द्यावी. कधीतरी जुन पुस्तक चाळताना ते मिळालेल फूल जुनी ठेव मिळाल्यासारखा आनंद देऊन जातं.

जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती हे फुला-पानांनही लागु होत. काहींचा रंग सुकल्यावरही टिकून राहतो, काहींचा फिकट होतो तर काहींचा रंग अगदी बदलून जातो.

Though they do not smell afterwards they look beautiful in their own way.