Ha Gandh Fulancha (हा गंध फूलांचा): 2020

Saturday, November 28, 2020

| निशिगंधा |

प्रत्येक फुलाचा एक विशिष्ट गंध असतो ( उग्र, मोहक, मंद, इ.). तसेच निशिगंधाचा गंध हा मादक या संज्ञेत बसतो. रातराणीप्रमाणे निशिगंधा/ रजनीगंधा नावाप्रमाणेच रात्री उमलते. रात्री निशिगंधाचा सुगंध असा काही घरभर (निदान खोलीभर तरी) पसरतो, किमान पाच सेकंद तुम्हाला खिळवून ठेवण्याची क्षमता त्या फुलात आहे. निशिगंधाच्या एका तुर्यातून दहा ते पंधरा दिवस फूलं फुलत राहतात.

निशिगंधाचे कंद आपण कुंडीत लावू शकतो. कंद जेवढे जास्त तेवढा कुंडीचा आकार मोठा घ्यावा. एक ते दोन फूट वर तूरे वाढून त्या तूर्याला निशीची फुलं येतात. जून महिन्यापासून फुलं यायला सुरुवात होते. निशिगंधाला फुलं येण्यासाठी प्रखर सूर्यप्रकाशाची गरज असते. मातीत ओलावा कायम राहायला हवा. एका तूर्यातून सर्व फुलं येऊन गेली की तो तुरा कापून टाकावा. दर 10 ते 15 दिवसांनी खत द्यावे. ह्या फुलाला खताची गरज इतर फुलझाडांपेक्षा अधिक असते. 

अश्या या पांढर्‍या, नाजूक फुलांचा गंध एकदा आपण अनुभवला की आपण ह्या फुलांच्या फूलण्याची वाट नक्कीच बघत बसतो.


Saturday, November 7, 2020

| मिट्टी का ग़मला |


वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ह्यांना समान महत्त्व असतं तसच आपल्याला एखादं झाड लावायच असल्यास कुठे, कोणत, आणि कोणत्या कुंडीत या तिन्ही गोष्टींनाही तेवढंच महत्त्व आहे.

एखाद झाड हे वेगवेगळ्या कुंडीत ( प्लास्टिक, माती, कापड, सिरॅमिक, काँक्रीट, इ.) वेगळी प्रतिक्रिया देतं. म्हणजेच आपण कोणत्या प्रकारच्या कुंडीत झाड लावत आहोत त्यानुसार झाडाच्या वाढीत फरक दिसू शकतो.

मातीच्या कुंडीची जागा प्लास्टिकच्या कुंडीने घेतली आहे. त्याचं मुख्यत्वे कारण हेच आहे की प्लास्टीकची कुंडी ही easy to handle आहे आणि वजनाला अतिशय हलकी आहे. ग्रील मध्ये आपण जास्त वजनाच्या कुंड्या नाही ठेवू शकत. त्यामुळे, तिथे प्लास्टिकच्या कुंडीला प्राधान्य द्याव लागतं. परंतु, ही नकारात्मक बाब सोडल्यास मातीची कुंडी ही कोणत्याही झाडासाठी उत्तम आहे. मातीच्या कुंडीतून aeration (हवा खेळती राहते) उत्तम होतं. ज्यांचा पाणी देण्यावर अधिक हात आहे त्यांनी मातीच्या कुंडीत झाडं लावण उत्तम. कारण, माती काही अंशी पाणी शोषून घेते त्यामुळे  root rotting होत नाही आणि मूळं सुद्धा खुप निरोगी राहतात. Indoor झाडांसाठी मातीची कुंडी खूप उपयोगी ठरते. घरात हवा कमी खेळती राहते (air ventilation) त्यामुळे aeration हे मातीच्या कुंडीत खूप छान होतं.

मातीच्या कुंडीला प्लास्टीकची कुंडी हा पर्याय आहे. परंतु, झाड हे "मिट्टी के ग़मले में" जास्त खुष असतं.

Saturday, October 24, 2020

Pothos उर्फ मनीप्लांट

मनीप्लांट हे झाड/वेल कोणत्याही घरात जाऊन समरूप होऊ शकतं. ह्याचा अर्थ असा की काही झाडं वाढवण्यास खूप सोप्पी असतात परंतु काही केल्या ती आपल्या घरी वाढत नाहीत, आपल्याकडून जगली जात नाहीत. किंवा काही झाडं/रोपटी आपल्या घरातील कमी/जास्त सूर्यप्रकाशामुळे, हवामानामुळे किंवा जागेच्या अभावामुळे आपल्या घरात वाढू शकत नाहीत. परंतु, मनीप्लांट अस एक झाड आहे जे आपण  नर्सरीमधून, कोणाकडून किंवा रस्त्यावरून आणुन कधीही लावू शकतो. 

मनीप्लांट वाढवण्याचा असा काही  formula नाही किंवा अशी काही पद्धत नाही आहे. कारण हे झाड प्रखर सूर्यप्रकाश ते खूप कमी सूर्यप्रकाशातही जगत. कमी जागेत म्हणजेच लहान ते मोठ्या कुंडीत पण छान वाढतं. २-३ दिवस पाणी नाही दिलं तरीसुद्धा ह्याची पानं टवटवीत दिसतात (पाणी देण्याच्या कालावधीत हवामान आणि झाड कुठे लावल आहे म्हणजेच indoor/outdoor ह्यानुसार बदल होऊ शकतो.)

मनीप्लांट जर भरगच्च (bushy) हव असेल म्हणजेच छान गुच्छ दिसावा असं वाटत असेल तर त्याची सतत कापणी (pruning) करणं गरजेचं आहे. त्यामुळे मनीप्लांट ची वाढ सरळ न होता बाजूंनी होउन झाड bushy बनत. आणि hanging pots मध्ये लावायच असल्यास त्याची सरळ वाढ होऊ द्यावी. मनीप्लांटचे aerial roots खूप महत्त्वाचे असतात. मनीप्लांट ला खत देण्याची किंवा माती बदलण्याची सहसा गरज नसते. जेवढं जास्त आपण ह्या झाडाकडे दुर्लक्ष करू तेवढ हे झाड छान वाढत. Direct सूर्यप्रकाशामध्ये मनीप्लांटची वाढ जलद गतीने होते.

Pothos ला मनीप्लांट का म्हणतात हे मात्र अजून कोडच आहे. 

Saturday, September 19, 2020

| अनंत |

अनंत काळ ज्या फुलाचा सुगंध किंवा घमघमाट आपल्या मनात दरवळत राहतो त्या फुलाला नाव म्हणूनच अनंत असे दिले असावे.

काही व्यक्ती अष्टपैलू नसतात मात्र त्यांचा एकच गुण इतका भक्कम असतो की आपलं त्यांच्यातील इतर गोष्टींकडे लक्षच जात नाही. अनंताचही काहीस असंच आहे ह्या फुलांचा सुगंध इतका हृदयस्पर्शी असतो की आपलं ह्या फुलाच्या इतर गोष्टींकडे (रंग,रूप,इ) लक्षच जात नाही.

हे फूलझाड जमिनीत लावण्यासाठी उत्तम आहे. परंतु कुंडीत लावल्यावरही फुलांचा बहर छान मिळतो. कुंडी कमीत कमी मध्यम आकाराची असावी (१२"-१४" किमान) या झाडाची ३-४ महिन्यातून एकदा काटछाट (pruining) करावी. अनंताला कीड-बुरशी अगदी क्वचितच लागते. त्यामुळे या झाडाची तितकीशी काळजी घ्यावी लागत नाही. ह्या झाडाला direct sunlight आणि नियमित पाणी देणे गरजेचे आहे. २०-२५ दिवसांतून एकदा खत द्यावे.

बाल्कनीत विराजमान, शुभ्र कांती असलेले अनंताचे झाड संध्याकाळी बाल्कनीत चहा पिताना त्याच्या फुलाच्या हृदयस्पर्शी सुगंधाची अनुभूती देऊन जाते. अनंताच्या फुलांचा सुगंधित अनुभव काही औरच !!


Saturday, September 5, 2020

A curly tale of मिरची

Container gardening साठी मिरची हे "Most Suitable" झाड आहे (१२-१४ इंच व्यास असलेली कुंडी मिरचीच्या रोपट्यासाठी उत्तम आहे). मिरची हे तस सोप्प झाड आहे लावायला परंतु त्याची तेवढीच काळजीही घ्यावी लागते. मिरची हे "Attention Seeker Plant" आहे. पहिल्यांदी मिरचीचं झाड लावायच असल्यास बरेच अडथळे येऊ शकतात (म्हणजेच फुलं न येणं, फुलं गळून जाणं, फुलांना मिरची न धरणं, पानांना कीड लागणं). परंतु एकदा अनुभव आला की मिरची हे लावायला खूप सोप्प झाड आहे.

मिरचीच्या बऱ्याच जाती / प्रकार आहेत. आपल्याला कोणत्या प्रकारच मिरचीच रोपट लावायच आहे त्यानुसार आपण नर्सरीमधून मिरचीच्या बिया आणू शकतो किंवा बऱ्याच नर्सरीमध्ये मिरचीची रोपटीसुद्धा उपलब्ध असतात. मिरचीच्या प्रत्येक जातीनुसार germination period, फळधारणेचा कालावधी बदलत असतो. साधारणतः जानेवारी ते मार्च दरम्यान मिरचीच्या बिया लावाव्या. (मिरचीच्या बिया नर्सरी मधुन विकतही आणू शकतो किंवा घरी असलेल्या मिरच्यांपैकी एखादी लाल झालेली मिरची असल्यास त्याचाही बिया वापरात आणू शकतो)
मिरचीच्या बिया लावल्यानंतर साधारणतः ७-८ दिवसात true leaves येतात, मिरचीचं रोपट २ ते ३ महिन्यांमध्ये मोठं होतं. जोपर्यंत मिरचीला फुलं येत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांनी खत द्यावे. एकदा मिरचीला फुलं यायला सुरुवात झाल्यास दर ७ दिवसांनी खत द्यावे. मिरचीला दोन दिवसांतून एकदा पाणी दिल तरी चालण्यासारखे आहे परंतु मातीत ओलावा असायला हवा. उन्हाळ्यात मात्र मिरचीला रोज पाणी द्यावे. मिरचीच्या रोपट्याला direct sunlight ची आवश्यकता असते. 

मिरचीचं झाड ओपन टेरेस मध्ये किंवा जमिनीवर लावलं असल्यास pollination हे नैसर्गिकरीत्या होऊन फळधारणा होते. परंतु मिरचीच रोपट indoor किंवा बाल्कनीमध्ये असल्यास hand pollination कराव लागतं.

मिरचीला पटकन कीड लागते, पानं  दुमडल्यासारखी दिसतात, Mealybug चा प्रादुर्भाव होतो त्यामुळे सतत लक्ष ठेवावं लागतं. दर सात दिवसांनी कडूनिंबाच्या तेलाचा फवारा मारणे गरजेचे आहे. मिरचीच्या रोपट्याच्या आजुबाजूला अशी झाड किंवा फुलझाडं ठेवू नये ज्यांना पटकन कीड लागते.

मिरचीच्या एका झाडापासून आपल्याला पुरक मिरच्या मिळतात. पहिल्यांदी मिरचीचं झाड लावून कदाचित एवढे चांगले results मिळणार नाहीत परंतु एकदा त्याचा formula कळला की मिरचीचं झाड बाल्कनीमध्ये लावण खूप सोप्पी गोष्ट आहे.

Saturday, August 15, 2020

Queen of Dark - रातराणी

सुगंध म्हटल की क्षणात आठवणारी फुलझाडं म्हणजे जाई, जुई, चमेली, अनंत, इत्यादी. पण त्याच तोडीच अजून एक फुलझाड आहे ते म्हणजे "Queen of Dark - रातराणी". हिच्या नावातच ह्या झाडाच सारं आहे म्हणजेच रातराणी ची फूलं हि रात्री फुलतात, त्यांचा सुगंध रात्रभर दरवळत राहतो. रातराणीचा सुगंध मंत्रमुग्ध करणारा आहे. हि अतिशयोक्ती नसुन सत्य आहे. आपण ज्या जागी/ खोलीत झोपतो त्या खोलीच्या जवळपास जर रातराणीच झाड असेल तर नक्कीच रात्रीही प्रसन्न वाटत. परंतु, ह्याची फुल सुद्धा नाजूक आणि रेखीव असतात. Beauty with Aroma indeed.
रातराणी खूप स्वच्छंदी फुलझाड आहे. ह्याची तितकीशी काळजी घेण्याची गरज नसली तरी रातराणीचा बहर भरघोस ठेवण्यासाठी सतत न चुकता pruining करणे गरजेचे आहे ( किमान ३-४ महिन्यातून एकदा ). दर १५ ते २० दिवसांनी खत द्यावे. रातराणीसाठी नेहमी मध्यम किंवा मोठ्या आकाराच्या कुंडीचा वापर करावा. शक्यतो लहान कुंडी वापरू नये. भरपूर सूर्यप्रकाश आणि नियमितपणे पाणी द्यावे. रातराणीला सहसा कीड लागत नाही.

"मनी वसे ते स्वप्नी दिसे" अशी म्हण आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपताना रातराणीचा सुगंध मनी वसला तर स्वप्नात नक्कीच गणिताचा पेपर येणार नाही 🤭🤪

Saturday, August 1, 2020

बाटलीतलं झाड -भाग 3 (Growing edibles)

एखाद्या बाल्कनीमध्ये किंवा ग्रील मध्ये किचन गार्डन सुरू करणं म्हणजे थोड फार अवघड काम आहे कारण एकमेव "लिमिटेड स्पेस" (नाममात्र जागा). त्यामुळे horizontal space  म्हणजेच आडवी जागा संपल्यावर पर्याय उरतो तो vertical space चा (उभी जागा) पुरेपूर वापर करण्याचा. आणि त्यात टाकाऊ बाटल्या ह्या खूप सहकार्य करतात. ज्या भाज्यांची मुळं खोलवर जात नाहीत त्यांच्यासाठी आडव्या बाटल्यांचा उपयोग करू शकतो (बाटलीचा रुंद भाग  surface area म्हणून वापरला जातो )आणि ज्या भाज्यांची मुळं खोलवर जात असतील त्यांच्यासाठी उभ्या बाटल्यांचा कुंडी म्हणून वापर करू शकतो‌ (बाटलीचा अरूंद भाग हा surface area म्हणून वापरला जातो). 
सगळ्या पालेभाज्या , गव्हांकुर, पूदीना, कोथिंबीर, इतर herbs, lettuce, microgreens, इ.  आपण बाटलीत लावू शकतो. Vertical space चा पुरेपूर वापर करण्यासाठी ह्या बाटल्या एखाद्या hook ला अडकवून  ग्रिलला लटकवू शकतो. ह्याचे दोन फायदे आहेत भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि मातीमध्ये aeration चांगले टिकून राहते. फक्त बिया फार जवळ लावल्यास पानांचा आकार लहान होतो. 

किचन गार्डन ज्यांना सुरू करायच आहे किंवा फक्त try करून बघायच आहे किंवा ज्यांना कुंड्या  विकत आणण्यावर जास्त खर्च करायचा नाही आहे त्यांच्यासाठी बाटल्यांमध्ये edibles लावणे हा उत्तम पर्याय आहे.

Saturday, July 18, 2020

Admiring beauties - गोकर्ण आणि गणेशवेल

आपण नर्सरीमध्ये जातो. आपल्याला सुंदर फुलझाडं दिसतात आणि आपण त्यांना घरी आणतो. त्यातली काही seasonal flowering plants असतात म्हणजेच वर्षातला काही काळच त्यांना फूलं येतात, काहींची बरीच काळजी घ्यावी लागते तर काही अचानक कोमेजून जातात. पण, काही अशीही फुलझाडं आहेत जी वर्षभर फुलतात काही काळजी न घेता. त्यातली दोन फुलझाडं म्हणजेच गोकर्ण आणि गणेशवेल.
हि दोन्ही फुलझाडं आळशी आणि beginer's साठी उत्तम आहेत. ह्या दोन्ही झाडांना कीड लागत नाही व  ह्यांची निगा राखायचीसुद्धा गरज नसते. हि दोन्ही फुलझाडं वेली ह्या प्रकारात मोडत असल्याने कमी जागेसाठी उत्तम आहेत. लहान कुंडीतही ह्यांना छान बहर येतो. ह्या झाडांच्या बियांपासून आपण परत नव्याने सुरुवात करू शकतो. ह्यांची वाढही जलद आहे.

ह्या फुलझाडांचा मंत्र हाच : दररोज पाणी, प्रखर सूर्यप्रकाश आणि महिन्यातून एकदा खत.

थोडक्यात, 'सुगंध' ही बाब बाजूला सारल्यास दुसरी अशी कोणतीही गोष्ट नाही जी या दोन्ही फुलांमध्ये नाही. दोन अतिशय नाजूक सुंदर फूलं whose elegance & beauty can't be helped but adored..."

Saturday, July 4, 2020

Indoor झाडं

Indoor आणि Outdoor झाडं ह्यांच वर्गीकरण मुख्यत्वे त्यांना लागणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या गरजेवरून होतं. ज्या झाडांना प्रखर सूर्यप्रकाशाची (direct sunlight) गरज नाही ती झाडं आपण घरातीही लावू शकतो. जर आपण निसर्गाजवळ जाऊ शकत नाही तर किमान या काँक्रिटच्या (concrete) जंगलात आपल्या घरातला छोटासा कोपरा हिरव्या सजीवांना नक्कीच देऊ शकतो. ज्यात फायदाही आपलाच आहे. Indoor झाडं म्हणजे जी झाडं आपण घराच्या आत लावू शकतो. त्यातही खूप प्रकार आहेत (हवा शुद्ध करणारी झाडं,  कीटक/ डास दूर ठेवणारी झाडं, इत्यादी). syngonium, cymbidium goeringii, eranthemum pulchellum ही झाडं काळजी घेण्यास अगदी सोप्पी आहेत. ही तिन्ही झाडं आपल्याला जास्त त्रास देत नाहीत फक्त ह्यांची काळजी घेताना ३ गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.
१) उन्हाळ्यात रोज पाणी द्यावे लागते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात एक दिवस सोडून पाणी दिले तरी चालते. आपण कुंडी ( प्लास्टिक किंवा माती) कोणत्या वस्तूची वापरतो त्यावरही पाण्याची मात्रा अवलंबून असते.
२) ह्या तिन्ही झाडांना प्रखर सूर्यप्रकाशाची गरज नसली तरी  indirect/medium सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यामुळे खिडकीजवळ या झाडांची वाढ चांगली होते. 
३) Regular misting. म्हणजेच त्या तिन्ही झाडांना  किमान ४ ते ५ दिवसांनी एकदा पाण्याचा फवारा मारावा आणि पानांवरील धूळ साफ करावी.
वरील सांगितलेल्या झाडांचे बरेच उपप्रकार आहेत. म्हणजेच ती झाडं विविध रंगातही (पानांचे रंग)उपलब्ध आहेत.
Indoor झाडांना महिन्यातून एकदा liquid fertilizer (खत) द्यावे. Liquid fertilizer घराच्या आतील झाडांसाठी जास्त सोयीस्कर असतात.

ह्या तिन्ही झाडांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे पानांचे रंग अगदी सुरेख आणि रंगीबेरंगी असतात. त्यांना बघितल्यावर त्यांना आपल्या घरी न आणण अगदी अशक्य होतं.

Saturday, June 27, 2020

Container gardening- लेट्यूस

लेट्यूस हे जरी पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीरीसारखी रोज लागणारी गोष्ट नसली तरी सध्या ह्याची लोकप्रियता वाढत चालली आहे. Burgers आणि salads मध्ये हे नसलं तर काहीतरी कमतरता नक्कीच जाणवते (निदान मला तरी...!). तर, हेच लेट्यूस आपण घरी देखील लावू शकतो. पुदिना, कोथिंबीर इतक लावायला सोप्पं जरी नसलं तरी अगदीच अवघडही नाही.
लेट्यूस मध्येही बरेच प्रकार आहेत. आपल्याला जो प्रकार आवडतो त्याच्या बियांपासून सुरुवात करावी. ( ह्याच्या बिया ऑनलाईन नर्सरीमध्ये मिळतात‌‌. स्थानिक नर्सरीमध्ये शक्यतो उपलब्ध नसतात).  लेट्यूसची मूळं खोलवर जात नाहीत त्यामुळे उथळ आणि पसरट कुंडी ह्याला उत्तम आहे. अंतर ठेवून लेट्यूसच्या बिया लावल्यावर कुंडी अशा ठिकाणी ठेवावी ज्या ठिकाणी ४ ते ५ तास प्रखर सूर्यप्रकाश ( direct sunlight) असेल. एकदा true leaves दिसले की त्यानंतर १० ते १५ दिवसांनी लेट्यूस थोडं आडोशाच्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी ठेवावे जिथे लेट्यूसला प्रखर सूर्यप्रकाश लागणार नाही. लेट्यूसच्या बियांना germination साठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
लेट्यूससाठी खतं युक्त माती असणे गरजेचे आहे. { माती (६०) : खत (४०) }. दर सात दिवसांनी नायट्रोजनचे प्रमाण जास्त असलेले खत द्यावे. लेट्यूसला पाणी देताना काळजी घ्यावी लागते. पाणी जास्त झाल्यास मुळ कुजू शकतात. व कमी झाल्यास पानं मलुल पडतात. त्यामुळे अती पाणी देणे टाळलं पाहिजे परंतु मातीत नेहमी ओलावा असायला हवा. लेट्यूसची पानं आपण ३० ते ४० दिवसांमध्ये कधीही harvest करू शकतो.

थोडीशी काळजी आणि घरच्या घरी आपण लेट्यूस लावू शकतो !!

                            





Saturday, June 20, 2020

Container gardening - कोथिंबीर

कोथिंबीर घरी लावताना बागकामाची खूप कमी माहिती असूनसुद्धा आपण यशस्वीपणे कोथिंबीर लावू शकतो. कोथिंबिरीची मुळं जास्त खोलवर जात नसल्यामुळे उथळ व पसरट कुंडी घ्यावी. कोथिंबीरीच्या बिया/ धणे घरी उपलब्ध असतील तर ते वापरू शकतो किंवा नर्सरीमध्येही कोथिंबिरीच्या बिया /धणे मिळतात (त्यांचा germination rate जास्त असतो). कोथिंबीरीसाठी माती तयार करताना माती,कोकोपीट आणि शेणखत ह्यांचे (५०:२५:२५) असे प्रमाण घ्यावे. परंतु, फक्त मातीत सुद्धा कोथिंबीर चांगल्या प्रकारे लागते. धणे घेताना ते थोडे भरडून घ्यावे म्हणजेच  एका धण्याचे दोन भाग करून घ्यावे. व तसेच मातीत पेरावे किंवा १-२ तास पाण्यात ठेवून मग मातीत पेरावे. धणे पेरताना एकमेकांमध्ये अंतर ठेवून पेरावे. दोन बियांमध्ये कमी अंतर राहिल्यास कोथिंबिरीच्या पानांची वाढ होत नाही. ५-६ दिवसात अंकूर फुटतात व ३०-४० दिवसांमध्ये आपण कोथिंबीर कधीही harvest करू शकतो. कोथिंबिरीची फुलं दिसेपर्यंत आपण कोथिंबीर harvest करू शकतो. दर पंधरा दिवसांनी शेणखत किंवा आणि Neem cake Powder खत म्हणून वापरावे. 
भरपूर सूर्यप्रकाश (direct sunlight), दररोज पाणी (पावसाळ्यात एक दिवसाड) आणि दर १५ दिवसांनी खत ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर घरच्या घरी सहजरित्या कोथिंबीर मिळू शकते

Saturday, June 13, 2020

Budget Gardening - अंडे का फंडा

जेव्हा आपण एखाद्या झाडाची/रोपट्याची सुरुवात बी पासून करतो तेव्हा आपण बी एकदम कुंडीत न पेरता छोट्याशा seedling tray मध्ये लावतो. seedling tray मध्ये "बी" चा germination rate जास्त असतो. अंड्याचे कवच (egg shell) हे seedling tray च घरगुती आणि स्वस्त स्वरूप आहे. एकदा "बी" ला अंकुर फुटुन true leaves दिसले की ते आपण ज्या कुंडीत रोपट लावायचं आहे त्यामध्ये (अंड्याच्या कवचासकट) लावू शकतो. 
ह्याच बरोबर, वापरून झालेल अंड्याच कवच टाकून न देता ते १-२ दिवस उन्हात ठेवून त्याचा चुरा करून आपण मातीत एकत्र करू शकतो. ह्याचा मला खूप चांगला असा फरक दिसून आला नाही परंतु वाईट फरकही दिसला नाही

P. S : अंड पहिलं की कोंबडी याचा विचार करत आपण बी पेरली (अंड्याच्या कवचात) तर germination rate १००% मिळतो 🤪😃🤣

Saturday, June 6, 2020

माझी (छोटीशी) बाग आणि पर्यावरण....

रोजच्या रोज आपण जो कचरा निर्माण करतो त्याच काही अंशी प्रमाण कमी केलं किंवा तयार झालेला कचरा परत वापरता आला तरी खऱ्या अर्थी पर्यावरणाची किंचित काळजी आहे असं म्हणू शकतो. अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्या पर्यावरणासाठी बरच काही करत आहेत. ज्यांचा (मी) या गोष्टींमध्ये हातभार नाही त्यांनी आपल्या घरापासून सुरुवात केली तरी खूप आहे. घरी छोटीशी बाग किंवा ५-६ कुंड्या जरी असतील तरी त्या झाडांसाठी लागणार कंपोस्ट घरी बनवताना ओल्या कचऱ्याचा वापर होतो. कोरडा कचराही थोड्याफार प्रमाणात परत वापरात आणला जाउ शकतो. प्लास्टिक पिशव्यांचा ऐवजी कापडी पिशव्या वापरल्याने plastic waste तयार होत नाही.

छोट्या छोट्या गोष्टी अंमलात आणल्या तर आपण आपल्यापासून नक्कीच सुरुवात करू शकतो, पर्यावरण दिन रोज साजरा करू शकतो 




Saturday, May 30, 2020

Microgreens आणि बरंच काही...

बाल्कनी गार्डन किंवा किचनच्या खिडकीजवळ म्हणजेच कमी जागेत लावण्यासाठी परिपूर्ण अशी गोष्ट म्हणजे microgreens (मायक्रोग्रींन्स). सर्वात सोप्पे, जलद आणि तेवढेच पोषकही.

Microgreens म्हणजे नक्की काय ?
एखादा रोपट्याची आपण बीपासून सुरुवात करतो. जेव्हा बिला अंकुर फुटत त्याला Cotyledon म्हणतात (जो बीचा एक भाग असतो), त्यानंतर true leaves (रोपट्याला येणारी पहिली पानं) येतात. आणि एकदा true leaves आल्यानंतर जर आपण त्यांचा उपयोग खाण्यासाठी केला किंवा त्यांना harvest  केलं तर त्यांना microgreens म्हणतात. microgreens दिसायलाही अगदी सुरेख असतात त्यामुळे microgreens मुख्यत्वे  garnishing साठी, salads मध्ये अन्नाची पोषकता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

Microgreens मध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील काही सोप्पे पर्याय म्हणजे मोहरी, पालक, मेथी, गाजर, कोथिंबीर, lettuce इत्यादी. ह्यांच्या बिया ४-५ इंच खोली असलेल्या मातीच्या भांड्यात किंवा ट्रेमध्ये दाटीवाटीने लावाव्या. प्रखर ऊन मिळणाऱ्या खिडकीजवळ हे भांड ठेवाव.आणि ७ - १४ दिवसांमध्ये microgreens कधीही हार्वेस्ट करावे. Cotyledon, true leaves आणि steam ह्या तिन्ही गोष्टींनी microgreens तयार होतात. ह्यात मुळांचा समावेश नसतो.

मोठ्या रोपट्याची छोटीशी प्रतिकृती म्हणजेच microgreens



Saturday, May 23, 2020

सदाफुली - Catharanthus 🌼

घरी एखाद फुलझाड आणायचं म्हटलं की पहिल्यांदा आपली नजर गुलाब, जास्वंद, जाई-जुई या मोहक, सुवासिक आणि तितकच वाढवण्यास कठीण फुलझाडांवर जाते. कठीण कारण त्यांची बरीच काळजी घ्यावी लागते. सदाफुली हे एक अस फुलझाड आहे जे सुंदर व मोहक आहे अपवाद सुवासिकता.परंतु तरीही सदाफुली  "पहिल्या १०" च्या यादीत येत नाही.
सदाफुली बऱ्याच रंगात उपलब्ध आहे. सदाफुलीला वर्षभर बहर असतो (नावातच अर्थ दडला आहे). सदाफुलीच्या पूर्णतः पांढऱ्या फुलांना औषधी महत्त्व आहे. छोट्याश्या छोट्या कुंडीतही सदाफुलीची रोपटी तग धरून फुलं येतात. अगदी एका बाटलीतही ह्याच रोपट छान वाढत.दररोज किंवा एक दिवसाआड पाणी द्याव लागतं (मातीत ओलावा कायम राहिला पाहिजे). प्रखर ते मध्यम सूर्यप्रकाश चालतो. त्यामुळे आपण घराच्या आत खिडकीजवळही हे रोपट वाढवू शकतो. सदाफुली पाण्यातही उत्तम वाढते. एखादी फांदी कापून आपण पाण्यातही वाढवू शकतो. एकंदरीत, सदाफुलीची नाममात्र काळजी घ्यावी लागते. त्यामुळे वाढवण्यास अगदी सोप्प अस फुलझाड आहे.

माझ्यासाठी सदाफुली अशी एक व्यक्ती आहे जी इतरांकडून जास्त काही न मागता भरभरून देते 🌼

Saturday, May 16, 2020

Budget gardening - चहा पावडर

बागकामासाठी साहित्य, वस्तूंची खरेदी करणे (कुंडी, माती, रोपटी, खत) हे कपडे खरेदी करण्यासारख आहे. जेवढ्या वस्तू घ्याव्या तेवढ्या कमीच. त्यामुळे कुठेतरी बजेट ठरवावं लागतं. आणि हा खर्च काही अंशी कमी करण्यासाठी पर्यायी साधनं/ वस्तू आपल्या घरीच उपलब्ध असतात.
"चहा पावडर" हा अनेक पर्यायांपैकी एक पर्याय आहे

चहा पावडर ही चहाबाज/चहाप्रेमी लोकांच्या मूलभूत गरजांमधली एक गरज आहे. (अन्न-वस्त्र-निवारा-चहा). परंतु हा चहा बनवून झाल्यावर ती चहा पावडर कचरापेटीचं धन होते. त्याऐवजी हीच टाकाऊ चहापावडर आपण बागकामात झाडांचा खाऊ /खत म्हणून वापरू शकतो. चहा पावडर हे खूप slow आणि mild fertilizer आहे. त्यामुळे आपण हे ३-४ दिवसांमधून एकदा एका कुंडीत वापरू शकतो. चहा पावडर मध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे झाडाच्या वाढीला मदत मिळते, ज्या झाडांना फळे-फुले येत नाही (foliage plant) त्यांच्यासाठी चहा पावडर हा खत म्हणून उत्तम पर्याय आहे.

चहा बनवून झाल्यावर जी चहा पावडर उरते ती दोनदा धुवून घ्यावी व लगेच कुंडीत घालावी. जर लगेच कुंडीत घालायची नसल्यास ती चहा पावडर उन्हात सुकवून डब्यात साठवून ठेवावी.

दिवसातून ५-६ वेळा चहा पिऊन झाल्यावर ती चहा पावडर कचरापेटीत टाकताना कुठेतरी चरररर्  व्हायचं पण आता नक्कीच मी माझ्या चहाला पूर्ण न्याय देते असं वाटतं 🤪

Saturday, May 9, 2020

Plants under 30 days - फक्त ३० दिवस

बागकाम करताना एक स्वभावगुण असणं विशेष महत्त्वाचं आहे. तो स्वभावगुण म्हणजे संयम. बी लावल्यापासुनचा फळं-फूलं येईपर्यंतचा प्रवास हा खूप लांब असतो. म्हणूनच म्हणतात वाटतं, "सब्र का फल- फुल मीठा और खुबसुरत होता है|"
पण हा गुण सगळ्यांमध्ये नसतो. Slow train पेक्षा fast train ला प्राधान्य देणाऱ्या मला वाट बघण खूप कठीण जातं. परंतु, चांगली बातमी ही आहे की, काही फळझाड,फुलझाड, herb, असे आहेत जे आपण ३० दिवसात harvest करू शकतो. त्यापैकी माझ्या आवडीच्या ३ वनस्पती :
१. अळू :
अळूचे कंद एका कुंडीत लावले की ३० दिवसांमध्ये आपण harvest करू शकतो. अळू ही लावण्यासाठी अतिशय सोप्पी वनस्पती आहे. ह्याला मुबलक पाण्याची गरज असते. भरपूर (direct sunlight)  ते मध्यम सुर्यप्रकाशात (medium sunlight) छान वाढते.

२. कांद्याची पात :
कांद्याच्या बी पासून कांदा / कांद्याची पात मिळायला बराच कालावधी लागतो. परंतु, आपल्याकडे असलेला कांदा  एका कुंडीत लावला तर १०-१५ दिवसात घरच्या घरी कांद्याची पात मिळते.

३. गव्हांकुर :
गहू एका कुंडीत पेरावे. ३-४ दिवसात अंकुर आल्यावर गव्हांकुर १०-१२ दिवसांमध्ये कधीही  harvest करू शकतो. गव्हांकुराचे भरपूर औषधी गुणधर्म आहेत. त्यातील एक गुण म्हणजे गव्हांकुराचा रस उष्णता कमी करण्यास मदत करतो.

कमी वेळात, कमी जागेत, कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या ह्या वनस्पती container gardening  ( कुंडीतील बाग) साठी उत्तम पर्याय आहेत.

   गव्हांकुर 

 अळू 

 कांद्याची पात


Saturday, May 2, 2020

झाडांचा खाऊ - Compost

आपल्या वाढीसाठी, निरोगी व सुदृढ राहण्यासाठी जशी प्रथिने, जीवनसत्वे, इत्यादींची आवश्यकता असते त्याच प्रकारे झाडांनाही वाढीसाठी, रोगांशी लढा देण्यासाठी जीवनसत्वे, minerals, इत्यादींची गरज असते. जे त्यांना खतापासून मिळतं. त्यालाच आपण "झाडांचा खाऊ" म्हणू. खतांच्या बराच प्रकारांमधील एक प्रकार म्हणजे "कंपोस्ट". कंपोस्ट आपण घरच्या घरी, घरात असणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून बनवू शकतो.

कंपोस्ट बनवण्याचे साहित्य :
१.एक जुना म्हणजेच वापरात नसलेला माठ (जिथे नळ आहे तो काढून टाकावा त्यामुळे तिथे हवा जाण्या- येण्यास आणि अतिरिक्त पाणी बाहेर येण्यास जागा होईल). जर माठ उपलब्ध नसेल तर जुनी बादली किंवा टब घ्यावा व त्याला खालून छिद्र पाडावे (पाण्याचा निचरा होण्यासाठी व aerationसाठी)
२. माती, ३. आधी बनवलेलं कंपोस्ट किंवा शेणखत, ४. पाणी, ५. ओला कचरा - नायट्रोजन (kitchen waste म्हणजेच उरलेले अन्न, भाज्यांची सालं, ज्यांचं विघटन होऊ शकत असा कचरा), ६. वाळलेली पानं - कार्बन

कृती : 
माठात सर्वात आधी माती टाकावी नंतर आधी तयार केलेलं खत किंवा शेणखत त्यानंतर ओला कचरा त्याच्यावर वाळलेली पानं नंतर परत माती आणि सर्वात शेवटी हे मिश्रण एकजीव करण्यासाठी पाणी घालावे. ही cycle प्रत्येक वेळी repeat करावी.
वाळलेली पानं आणि ओला कचरा यांचे प्रमाण समान ठेवावं (१:१). आणि माती मुठभर घालावी. दर ७-८ दिवसांनी हे मिश्रण खालीवर करावे जेणेकरून aeration राहील. कंपोस्ट कोरड झालं की त्यात पाणी घालावे.

कंपोस्ट मध्ये कोणते पदार्थ टाकावेत ?
जे मातीपासून निर्माण झालं आहे ते सर्व पदार्थ, वस्तू आपण कंपोस्टमध्ये टाकू शकतो. परंतु काही पदार्थ असे असतात ज्यामुळे कंपोस्ट तयार होण्याच्या प्रक्रियेला जास्त वेळ लागतो. Acidic (आम्लीय) पदार्थ, अंड्याच कवच (egg shell), मांस या पदार्थांचं लवकर विघटन (decompose) होत नाही.
कंपोस्ट ची प्रक्रिया जलद करण्यासाठी जो काही कचरा (ओला कचरा) आपण टाकणार आहोत तो बारीक करून टाकावा. कंपोस्ट तयार व्हायला साधारणतः ४० ते ५० दिवस लागतात. जिथे कंपोस्ट तयार करणार आहोत ती जागा नेहमी साफ ठेवावी व जरा आडोशाला असावी. जिथे कंपोस्ट बिन ठेवलं असेल त्याच्या आजूबाजूला जर झाडं किंवा रोपटी ठेवायची असल्यास अशी ठेवावी ज्यांना कीड लागत नाही. शक्यतो मातीचं भांडच खत बनवण्यासाठी वापरावं.

या खतामुळे झाडांनाही त्यांचा खाऊ मिळतो आणि आपलं kitechen waste ही परत वापरता येतं (reuse). त्यामुळे हि पाककृती (recipe) "Worth trying" आहे :)

Saturday, April 25, 2020

पालक - Grow your own food

घरच्या घरी आपण लावलेल्या भाज्या बनवून खाण्यात खरंच एक प्रकारचं समाधान असतं.
माझ्यासारखे बरेच जण असतील जे फ्लॅटमध्ये राहतात त्यामुळे किचन गार्डनिंग मध्ये बऱ्याच मर्यादा येतात. आणि त्यातही नोकरी, इतर कामे करून बागकाम करणे म्हणजे अजून कठीण गोष्ट. पण काही भाज्या अशा आहे ज्या आपण कुंडीत लावू शकतो म्हणजेच ज्या बाल्कनी आणि विंडो ग्रिलच्या कमी जागेसाठी उत्तम आहेत. त्यातील एक पालेभाजी म्हणजे 'पालक'.
पालक ही एक अशी पालेभाजी आहे जी आपण वर्षभर कधीही लावू शकतो. पालक बियाणांपासून लावावा लागतो (पालकाच बियाणं खूप कमी दरात नर्सरी/ ऑनलाइन नर्सरीमध्ये मिळतं). साधारण चार-पाच दिवसात अंकुर येतात. एकदा true leaves दिसले की आपण त्यानंतर पालक कधीही harvest (कापणी) करू शकतो. पालक पूर्ण तयार व्हायला साधारणतः 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागतो. पहिल्यांदी पालक harvest केल्यावर (वरच्यावर पानं कापावी. मुळांपासून काढू नये ) त्यानंतर अजून १-२ वेळा परत पालक harvest करू शकतो. आठवड्यातून एकदा कडुनिंबाच्या तेलाचा फवारा मारावा. 
पालकासाठी माती तयार करताना मुबलक प्रमाणात खत घालावे (उदा. शेणखत, कंपोस्ट ) आणि दर १५ दिवसांनी खत देत रहावे. उन्हाळ्यात दररोज पाणी द्यावे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात १-२ दिवसातुन एकदा पाणी द्यावे.
तर, वर्षभर कधीही, जास्त काळजी न घेता आपण घरच्या घरी सेंद्रिय खतापासून पालक लावून हवं तेव्हा त्याचा आस्वाद घेऊ शकतो. स्वतःच्या हाताने लावलेला पालकाची चव खरंच वेगळी लागते.

{True leaves - 'बी'ला अंकुर फुटल्यावर आपल्याला छोटंस पान (एक किंवा दोन) दिसतं त्याला Cotyledons म्हणतात. हा बीचा एक भाग असतो. त्यानंतर, True leaves दिसतात. म्हणजेच, एखाद्या रोपट्याला जी भविष्यात पानं येणार आहेत त्याचं हुबेहूब पण लहान आकारातील version जे दिसायला Cotyledons पेक्षा खूप वेगळे असतं }

Saturday, April 18, 2020

लता-वेली (Vines)

वनस्पतींमधला सुंदर आणि आकर्षक प्रकार म्हणजे वेली.
वेली म्हणजे ज्या वनस्पती कोणत्याही गोष्टीचा आधार घेऊन वाढतात म्हणजेच त्यांचे खोड किंवा फांद्या मजबूत नसल्यामुळे त्या स्वबळावर वाढू शकत नाही आणि त्यांच्या याच वैशिष्ट्यामुळे आपण त्यांना ज्या जागी लावू त्या जागेला सुंदर बनवण्याचे काम नक्कीच त्या करतात.
आपण वेली हव्या त्या दिशेला वाढवु शकतो म्हणजेच उभ्या दिशेने (vertical travel) आणि आडव्या दिशेने (horizontal travel).
बऱ्याच प्रवेशद्वारांवर वेलींच्या सुंदर कमानी बघायला मिळतात. ते दृश्य नक्कीच विलोभनीय असतं  (निदान मला तरी तसं भासतं). कमीत कमी जागेत जास्तीत जास्त हिरवळ निर्माण करण्याच काम नक्कीच वेली करतात.
इमारतींमध्ये बाल्कनी railing आणि window (safety) grill इथे designing/decoration करण्यासाठी फार काही वाव नसतो. तिथे आपण ह्या वेली लावुन/सोडुन ती जागा नक्कीच सुंदर बनवु  शकतो.
वेलींमध्ये सगळ्या विभागातील वनस्पतींचा समावेश होतो. म्हणजेच औषधी, फळझाडं, foliage, फुलझाडं.
तर, ह्या नाजूका (लता-वेली) नक्कीच जागेच सौंदर्य वृद्धिंगत करण्याचं काम करतात. आणि त्यांच सौंदर्य पाहून आणखी झाडं लावायची इच्छा होते

Saturday, April 11, 2020

तुळस (Holy Basil)

हिंदू संस्कृतीमध्ये, वास्तुशास्त्रात आणि आयुर्वेदात तुळशीला फार महत्त्व आहे. तुळस संपत्ती, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेच प्रतीक आहे. एखाद्या नवीन घरी आपण गेलो आणि आपल्याला तुळशीचं छोटंसं का होईना रोपटं दिसलं की सकारात्मक ऊर्जेचा (क्षणिक का होईना) अनुभव येतो.
जुन्या धाटणीच्या घरात, गावी अंगणात तुळशी वृंदावन असतं. हल्ली इमारतींमध्ये अंगणच नसतं. परंतु, तरीही आपण बाल्कनीमध्ये, खिडकीत तुळशीचं रोपटं नक्कीच लावू शकतो. 
तुळस indoor plant म्हणूनही लावू शकतो म्हणजेच बेडरूम किंवा living room मध्ये तुळशीचं रोपटं लावू शकतो.
Basil ही वनस्पती बऱ्याच देशांमध्ये आढळली जाते. भारतात प्रामुख्याने Holy basil म्हणजेच तुळस हा प्रकार आढळतो. 
भारतात तुळशीचे प्रामुख्याने आढळणारे प्रकार :
१. कृष्ण तुळस २. राम तुळस ३. रान तुळस ४. कापूर तुळस. ह्याव्यतिरिक्तही अनेक तुळशीचे प्रकार आहेत.

तुळस घरात, घराबाहेर लावण्याचे प्रामुख्याने फायदे म्हणजे
१. हवा शुद्ध करण्याचं काम करते आणि mosquito repellent म्हणजेच तुळस असल्यास डासांचा  प्रादुर्भाव कमी होतो.
२. तुळशीची पानं गरम पाण्यात चार-पाच तास ठेवावी व नंतर त्या पाण्याचा फवारा खोलीत, बाल्कनीमध्ये मारावा.( हा नुस्का फेसबुकवर एका ग्रुप मध्ये आला होता). 
३. रोज सकाळी उठल्या-उठल्या दोन तुळशीची पानं खाणं आरोग्यदायी आहे (मात्र पानं जास्त चाऊ नये ). 
४. पाळीव प्राण्यांना उलट्या होत असतील तरीही तुळशीचा रस दिला जातो. 
५. तुळस ही उष्ण प्रकृती असलेली वनस्पती असली तरी तिच्या बिया शीतल प्रकृतीच्या असल्याने शरीरात उष्णता अधिक झाल्यास त्यांचे सेवन केले जातं

अशी ही बहुगुणी तुळस लावायला आणि वाढवायला अगदी सोप्पी आहे फक्त नियमितपणे पाणी द्यावे लागते आणि भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. तुळशीला खताची आवश्यकता नसते. परंतु, पानं चांगली टवटवीत दिसण्यासाठी महिन्यातून एकदा खत द्यावे (ज्यात नायट्रोजनचे प्रमाण अधिक असेल)
कधीकधी काही केल्या तुळस वाढतच नाही. याची कारणं बरीच असू शकतात.
१. तुळस सारखी मरत असेल तर माती बदलून बघावी किंवा दर 20 ते 25 दिवसांनी मातीचा वरचा layer खणावा (मुळांना त्रास होऊ न देता) ह्यामुळे मुळांना ऑक्सीजन मिळतो. म्हणजेच  मातीत aeration चांगलं राहतं
२. सूर्यप्रकाशाअभावी, ३. अनियमितपणे पाणी दिल्याने तुळस मरते.
४. उन्हाळ्यात मातीत कमी वेळ ओलावा टिकून राहतो. त्यामुळे मातीत cocopeat घालावे.

अश्या ह्या बहुगुणी तुळशीचं किमान एक तरी रोपटं घरी असणं गरजेच आहे